गौतम बुद्ध पौर्णिमा

गौतम बुद्ध पौर्णिमा ( वैशाख पौर्णिमा)

भारतात प्रत्येक पौर्णिमेचे विशेष स्थान असते आणि प्रत्येक पौर्णिमा तिथी वेगळ्या प्रकारे साजरा केली जाते. या क्रमाने हिन्दू कालनिर्णया नुसार वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा म्हणतात. ही पौर्णिमा तिथी खास आहे कारण या दिवशी भगवान विष्णूचा नववा अवतार महात्मा बुद्ध अवतरले होता. चला जाणून घेऊया या वर्षी बुधाची पौर्णिमा कधी पडेल आणि त्याचे महत्त्व काय आहे.

या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती व महानिर्वाण या तिन्ही घटना झाल्या आहेत.

बुद्ध पौर्णिमा तिथी

यंदा बुद्ध पौर्णिमा सोमवार, 16 मे रोजी साजरी होणार आहे.

पौर्णिमा सुरुवात 15 मे, रविवार दुपारी 12:45 पासून पौर्णिमा समाप्ति 16 मे, सकाळी 9:43 पर्यंत

बुद्ध पौर्णिमेला सूर्य मेष व चंद्र तुळ राशीत प्रवेश करतो. या दिवशी गंगेत केलेले स्नान पवित्र समजले जाते.

उदय तिथीमध्ये 16 मे रोजी पौर्णिमा तिथी येणार असल्याने या दिवशी पौर्णिमा व्रत धरले जाते.

बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते?

सर्व धर्माचे लोक गौतम बुद्धांचा जन्मदिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा करतात. गौतम बुद्ध भगवान विष्णूचा नववा अवतार मानला जातो आणि बुद्ध पौर्णिमेला त्यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की 563 ईसापूर्व पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्ध राजकुमार सिद्धार्थ गौतमाच्या रूपात प्रकट झाले होते. त्यांचा जन्म लुंबिनी येथे झाला आणि त्या दिवशी वैशाख महिन्यातील पौर्णिमा असल्याने हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जात असे.

बुद्ध पौर्णिमा पूजन

बुद्ध पौर्णिमेला, बौद्ध समुदायाचे लोक, मंत्र, ध्यान व उपवास करतात. सनातन धर्मिय या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतात आणि चंद्राची पूजा करतात. असे मानले जाते की या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत फलदायी असते.

  • या दिवशी बौद्ध घरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात आणि फुलांनी घर सजवले जाते.
  • बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे अखंड वाचन, पठण केले जाते.
  • बुद्ध विहारांमध्ये (बौद्ध मंदिरांमध्ये) आणि घरांमध्ये अगरबत्त्या लावल्या जातात. बुद्ध मूर्तीवर फळ-फूल चढवले जाते. आणि दिवा लावून पूजा केली जाते.
  • बोधिवृक्षाची पूजा केली जाते.
  • त्याच्या फांद्यांवर हार व रंगीत पताका सजवल्या जातात. मुळांना दूध व सुगंधित पाणी दिले जाते. वृक्षाच्या भोवती दिवे लावतात.
  • या दिवशी मांसाहार वर्ज्य असतो.
  • पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त करून खुल्या आकाशात सोडले जाते.
  • गरिबांना भोजन व वस्त्र दिले जाते.
  • बौद्ध अनुयायींना तेथे जाऊन प्रार्थना करता यावी यासाठी दिल्ली येथील बौद्ध संग्रहालयातील बुद्धांच्या अस्थी बाहेर काढून ठेवतात.
बुद्ध पौर्णिमा  पूजन

बुद्ध पौर्णिमा महत्त्व

जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.[१ ]

सनातन व बौद्ध धर्माचे लोक बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतात. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदर्शन शुभ मानले जाते . भगवान बुद्धांनी सारनाथ येथे पहिला उपदेश केला. त्यांनी 45 वर्षे अखंड ‘धर्म’, अहिंसेचा धडा शिकवला. त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धाची पूजा करणे फलदायी मानले जाते.

गौतम बुद्धांची शिकवण

बुद्धांनी सांगितलेली चार आर्य सत्य आचरणात आणल्यास माणूस त्याचे जीवन आनंदात घालवू शकतो.
१) दुःख असते
२) दुःखाला कारण असते
३) दुःखाचे निवारण करता येते.
४) दुःख कमी करण्याचे उपाय आहेत.

४ आर्य सत्ये


बुद्धांनी आठ मार्ग सांगितले आहेत.

१) सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.

२) सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.

३) सम्यक् वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.

४) सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.

५) सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.

६) सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.

७) सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.

८) सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे

बुद्ध पौर्णिमा : अष्टांग मार्ग
अष्टांगिक मार्ग

भारतात बुद्ध जयंतीची सुरवात

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती / बुद्ध पौर्णिमा दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील/प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली. १९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. १९५६ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस १९५३ पासून सुरुवात केली. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर केली, म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात.[१ ]

संदर्भ :

१) विकिपीडिया मुक्त ज्ञान स्त्रोत

२) PixaBay कॉपीराइट मुक्त चित्र स्त्रोत

Author: maymarathi